महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
schedule07 Dec 25 person by visibility 89 categoryसामाजिक
🔸'महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक' या विषयावर होणार मंथन; दिग्गज इतिहासकारांची उपस्थिती
कोल्हापूर : महाराणी ताराबाईंच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात "महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक: एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप" या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. ९) दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, शाहू संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र होत आहे.
भारतीय इतिहासातील तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून महाराणी ताराबाई ओळखल्या जातात. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल सत्ता देशभर पसरली होती, अशा कठीण प्रसंगी या २५ वर्षांच्या तरुण विधवा राणीने मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि कणखर नेतृत्वाचा सखोल अभ्यास करणे व त्यांच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळवून देणे, हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे.
चर्चासत्राचे पहिले सत्र मंगळवारी सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार चर्चासत्राचे सूत्रभाष्य करतील. अध्यक्षस्थानी मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख असतील. दुसऱ्या सत्रात महाराणी ताराबाईंचे चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांची विशेष मुलाखत डॉ. नंदकुमार मोरे घेतील. मुलाखतीनंतर लगेचच अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठातील ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार डॉ. रिचर्ड ईटन ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी होऊन 'दख्खनमधील महाराणी ताराबाईंचे कार्य' या विषयावर आपली मते मांडतील. जागतिक कीर्तीच्या इतिहासकाराकडून महाराणी ताराबाईंच्या योगदानाचा आढावा घेणे ही उपस्थित अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी आहे. बुधवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार असतील. याखेरीजही दोन्ही दिवशी विविध सत्रे होणार आहेत.
या चर्चासत्राच्या माध्यमातून महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्यावर आणि तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीवर नव्याने प्रकाश टाकला जाणार आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचा लाभ इतिहास अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील आणि छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या संचालक डॉ. निलांबरी जगताप यांनी केले आहे.