बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फतच आयोजन
schedule02 Nov 25 person by visibility 43 categoryराज्य
मुंबई : सन 2025-26 या वर्षासाठीची बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोणत्याही शासन बाह्य संस्थांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नाही. ही शासन आयोजित स्पर्धा असल्याने संचालनालय त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धा आयोजनाची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका संस्थेस देण्यात आलेली नाही. स्थानिक आयोजनातील सहकार्य आणि स्थानिक समन्वय यासाठी मात्र संचालनालय विविध संस्थांचे सहकार्य घेत असते, त्यापैकीच बालरंगभूमी ही एक संस्था आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम असो की नाट्य स्पर्धांच्या आयोजनात स्थानिक सहकार्य करणाऱ्या कलाक्षेत्रातील किंवा नाट्य क्षेत्रातील संस्थांचे सहकार्य नेहमीच सांस्कृतिक कार्य संचालनालय घेत असते. बालरंगभूमी ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न शाखा असल्यामुळे, स्थानिक सहकार्य व समन्वयासाठी संचालनालयास सहकार्य करत असते.
बालरंगभूमीप्रमाणे इतर संस्था आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर संचालनालयास वेळोवेळी सूचना करत असतात व त्यातील योग्य सूचनांवर संचालनालयामार्फत सकारात्मक विचारही करण्यात येत असतो.
बालनाट्य चळवळ अधिक प्रभावी व्हावी, जास्तीत जास्त बालकांनी या नाट्य स्पर्धेत प्रवेश घ्यावा व या नाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा, यासाठी वेगवेगळ्या नाट्य संस्थांशी संचालनालयामार्फत समन्वय ठेवण्यात येत असतो. नाट्य किंवा कलाक्षेत्रातील ज्या संस्था यासाठी स्वयंप्रेरणेने सहकार्यासाठी पुढे येतात, त्यांचेही सहकार्य संचालनालयामार्फत घेण्यात येत असते.