डॉ. विजय कुंभार यांची नवोपक्रम परिषदेसाठी निवड
schedule01 Nov 25 person by visibility 137 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. विजय कुंभार यांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयामार्फत आयोजित 'उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषदे'साठी (२०२५) 'युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान लीडर' म्हणून निवड झाली आहे. येत्या ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे ही राष्ट्रीय परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
ऊर्जा साठवणूक क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या आधारे डॉ. कुंभार यांची परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांनी उच्च-कार्यक्षमता असलेली 'अति-धारित्र' आणि 'जस्त-आयन घट' यांच्या विकासावर आपले संशोधन केंद्रित केले आहे. त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली असून, त्यांना जपान सरकारची प्रतिष्ठेची 'जेएसपीएस फेलोशिप' मिळाली आहे. त्यांनी दक्षिण कोरिया येथेही संशोधन कार्य केले असून, त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
नवोपक्रम परिषदेच्या माध्यमातून कुंभार यांना 'विकसित भारत २०४७' च्या तांत्रिक रूपरेषेला आकार देण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते, जागतिक तज्ञ आणि देशातील शीर्ष धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची अनोखी संधी लाभणार आहे. प्रयोगशाळेतील नवकल्पनांना शाश्वत विकासासाठी प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. डॉ. कुंभार यांच्या या यशाबद्दल प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी अभिनंदन केले आहे.