१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नये
schedule07 Dec 25 person by visibility 121 categoryराज्य
मुंबई : येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टिकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
सन २०२१ पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत वाहतूक विभागाकडून कोणतीही ई-चलान प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काही यूट्यूब, इंस्टाग्राम तसेच अन्य सामाजिक माध्यमांवर १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
▪️वाहतूक विभागाचे नागरिकांना आवाहन
ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सामाजिक माध्यमांवरील अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानची रक्कम भरणा करू नये. जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असल्यास, संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने कळविले आहे.