शेतीच्या परिवर्तनासाठी माणसामध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता : डॉ. अविनाश पोळ
schedule01 Nov 25 person by visibility 133 categoryराज्य
▪️‘सत्यमेव जयते फार्मर कप’ जिल्ह्यास्तरीय कार्यशाळा
कोल्हापूर : ग्रामीण भाग हा शेती व शेतीविषयक व्यवसायावर अवलंबून असल्याने, शेतीच्या विकासाशिवाय ग्रामीण भागात समृद्धी साधणे शक्य नाही. त्यासाठी शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. यासाठी केवळ अनुदानित निविष्ठा आणि प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन माणसामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण आणि मार्गदर्शनात प्रामुख्याने गुंतवणूक केली पाहिजे, असे डॉ. अविनाश पोळ, कार्यवाहक, पाणी फाउंडेशन यांनी सांगितले.
शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर (ता. करवीर) येथे गुरुवार (ता. ३०) रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नामदेव परीट, कृषी उपसंचालक यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतीच्या विकासाला पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून चालना मिळेल आणि त्यासाठी पुढील एकत्रित वाटचालीचा मार्ग मोकळा होईल.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी यावेळी शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, एआय चा वापर करून शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. सन २०२२ पासून पाणी फाउंडेशनने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ उपक्रमाद्वारे संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत ५०,००० हून अधिक शेतकऱ्यांवर याचा चांगला परिणाम झाला असून, त्यातील निम्म्या संस्था महिला शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे हे व्यासपीठ महिला सशक्तीकरणासाठीही प्रभावी ठरले आहे.
सध्या ‘फार्मर कप’ महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित केला जातो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात याचा विस्तार करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतीतील संघटनासाठी जनचळवळ उभी राहील आणि ग्रामीण समृद्धी साधता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व गावांमध्ये ही स्पर्धा राबविली जात आहे. त्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहाय्यक कृषी अधिकारी ते तालुका कृषी अधिकारी यांचे जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणास बसवराज मास्तोळी, विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर, संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर, जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या वेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.