भाऊ पाध्ये यांच्या साहित्याविषयी विद्यापीठात १२ पासून चर्चासत्र
schedule09 Dec 25 person by visibility 39 categoryराज्य
कोल्हापूर : साठोत्तरी कालखंडातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे येत्या १२ डिसेंबरपासून ‘भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पीएम-उषा योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात चर्चासत्र होणार आहे. अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी ही माहिती दिली.
डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पुण्याचे कवी, अनुवादक व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल, तर ज्येष्ठ लेखक-समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांचे बीजभाषण होईल. यावेळी आरती साळुंखे (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती असेल, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी असतील.
याच कार्यक्रमात गोरख थोरात अनुवादित भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या कादंबरीच्या हिंदी भाषांतराचे प्रकाशन होईल. यानंतर दिवसभरात भाऊ पाध्ये यांचे कथावाङ्मय, भाऊ पाध्ये यांचे कादंबरी वाङ्मय या विषयांवर चर्चा होईल. चर्चेत आसाराम लोमटे (परभणी), अवधूत डोंगरे (रत्नागिरी), शीतल पावसकर (मुंबई), नितीन रिंढे (मुंबई), दत्ता घोलप (वाई) सहभागी होतील. डॉ. माया पंडित-नारकर अध्यक्षस्थानी असतील.
१३ डिसेंबरला भाऊ पाध्ये यांच्या निवडक वाङ्मयाचे ओंकार थोरात अभिवाचन करतील. त्यानंतर ‘भाऊ पाध्ये: स्तंभलेखन, चित्रपटविषयक आणि अन्य लेखन’ या विषयावरील परिसंवाद डॉ. श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात प्रसाद कुमठेकर (मुंबई), गोरख थोरात (पुणे) आणि सचिन परब (मुंबई) सहभागी होतील. अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा समारोप होईल.