स्वच्छतासूर्य: कर्मयोगी संत गाडगेबाबा
schedule20 Dec 24 person by visibility 196 categoryसामाजिक
* २०डिसेंबर: संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त....
आपल्या समाजात जेव्हा अज्ञान, अनारोग्य ,अंधश्रद्धा आणि खुळ्या समजूतीने हाहाकार माजला होता, त्यातूनच अन्याय,अत्याचार आणि अनाचाराचे वादळ उठले होते, तसेच फसवणूक, लुबाडणूक आणि छळवणूकीला ऊत आला होता; दोरा, गंडा,ताईत,अंगारा अशा बेभरवशाच्या कर्मकांडाचा बाजार भरला होता, माणूसकीची लक्तरे वेशीवर टांगून ठेवली होती, अशा काळात आपल्या हातात 'खराटा' घेऊन अस्वच्छ शहर, गावं, वाड्या,वस्त्यां आणि लोकांची काळवंडलेली मनं साफ करण्यासाठी एक आगळा वेगळा ' स्वच्छता सूर्य ' उगवला,त्याचं नाव ' गाडगेबाबा'.
गाडगेबाबा दिवसा खराट्याने गावं नि गावं झाडून स्वच्छ करायचे, आणि रात्री अंधश्रद्धेच्या बेडीत अडकलेल्या सामान्य जनतेची मनं साफ करायचे.गरीब माणसांची दैन्य आणि दुर्दशा संपावी, आणि त्यांना सुखाने, आनंदाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांनी हातात खराटा घेऊन जनता जनार्दनाची महापूजा केली.त्यासाठी गावे नि गावे, मैलोनमैल पायपीट केली. कुठल्याही गावात प्रवेश केला की,आधी स्वत: खराटा घेऊन गावात स्वच्छतेला सुरवात करायचे,मग ते पाहून अख्खा गाव स्वच्छतेच्या कामात मदत करायचा. धूप,दीप,गंध आणि फुले घेऊन देवाची पूजा करण्यापेक्षा जनता जनार्दनाची गावं आणि मनं स्वच्छ करणे हीच खरी देवाची महापूजा आहे, असे ते समजत. मठ, मंदिरे, तीर्थ क्षेत्र आदींच्या वा-या करून आपली दु:खे दूर होतील हा भ्रम आहे,माणसाने प्रामाणिक कष्ट आणि जिद्दीने आपले जीवन आनंदमय सुखमय करावे,असे त्यांचे सांगणे असायचे. त्यांनी 'झाडू'सारख्या एका साध्या साधनांचा वापर करून जनजागृतीची मोहीम उघडली.स्वच्छतेचा मंत्र जपत मानवी जीवनात आनंदवन निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले.
गाडगेबाबा ज्या गावात जात तेथे स्वच्छतेचा 'कर्मयज्ञ ' आरंभीत.न बोलता एखादा माणूस अचानक गावात येतो काय आणि सारें गाव झाडून स्वच्छ करतो काय,हे सारें औरच असायचे.रात्री किर्तनासाठीचा परीसर बाबा स्वत: स्वच्छ करायचे. किर्तनासाठी वृत्तपत्रात जाहिरात नसे.एखाद्या झाडावर किंवा चौकातील कट्ट्यावर "आज येथे गाडगेबाबांचे किर्तन होईल"असे लिहिलेले असे. वा-यासारखी ती बातमी पसरे.आसपासचे चालत, बैलगाडीने येत, लोक जमिनीवर मांडी घालून बसत. बाबांच्या किर्तनाला दाटीवाटीने बसत.आपल्या दु:खावर,अज्ञानावर,वेड्या समजूतीवर हसत खेळत विनोदी अंगाने मांडलेले विचार त्यांच्या मनात घर करुन राहत.
आपल्या समाजातील गरीब दुबळे जन फसवले जातात, शेतकरी लुबाडले जातात, शेतमजूर,कामगारांना अल्प वेतनावर राबविले जाते, देवाधर्माच्या नावांवर नागवले जाते,हे पाहून समाज शिकला सवरला पाहिजे, म्हणून ते किर्तनातून शिक्षणाचा प्रसार करीत. भुकेकंगाल लोकांना अन्न मिळावे, तहानेने व्याकूळ झालेल्यांना पाणी मिळावे,विवस्त्र व अर्धनग्न अवस्थेत असणा-यांना अंगभर कपडे मिळावेत,बेकार व बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा,गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावे, गरीब मुलामुलींची लग्ने हुंड्याशिवाय व्हावीत,बेघर तसेच अनाथ, निराधार लोकांना निवारा तसेच आश्रय मिळावा, रुग्णांना वेळेवर योग्य व माफक दरात औषधोपचार मिळावा,मुक्या जनावरांना अभय मिळावे आणि दु:खी, निराशांना हिम्मत मिळावी हीच देवाची महापूजा होय, असे ते दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन पटवून देत.जनसेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांचा मंत्र होता,तर रंजल्या गांजलेल्या जनतेची सेवा हाच त्यांचा रोकडा धर्म होता.गरीब माणसांची सामाजिक व धार्मिक फसवणूक व लुबाडणूक थांबावी,त्यांची दारिद्र्य व दुर्दशेने होणारी ससेहोलपट संपावी आणि त्यांना सुखाने चार घास तोंडात घालता यावेत यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले, त्यांनी खराटा हे माध्यम वापरून जनांसाठी 'खराट्याचे पसायदान' च सांगितले.या जगात जो पर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत माणूस नावाचा प्राणी आहे, अशा या माणसाला सुख- शांती, आरोग्य आणि धनसंपदा लाभावी यासाठीच गाडगेबाबांचे खराट्याचे पसायदान होते.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर'दर्पण'पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)