हरिनामाच्या गजरात कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ ‘कार्तिकी दिंडी’ सोहळा उत्साहात
schedule02 Nov 25 person by visibility 78 categoryसामाजिक
▪️पंचक्रोशीतील 84 गावांतील तरूण मंडळे - वारकरी परिवारांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आणि प्रति पंढरपूर नंदवाळ या दोन तीर्थक्षेत्रांचा अध्यात्मिक सेतू अधिक दृढ करणारी पहिली कार्तिकी वारी हरिनामाच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाली.
ह.भ.प. महादेव यादव महाराज , दिंडी प्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज व मुख्य समन्वयक दीपक गौड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अध्यात्मिक भावपूर्ण सोहळा यशस्वीपणे पार पडला.
मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सामुदायिक आरतीने दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा दर्डीकर, डॉ. सूर्यकांत वाघ, हुपरी चे अभयसिंह घोरपडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिंडीत सुरुवातीला माऊलीं चे दोन अश्व बैलगाड्या आणि दोन उंटांसह भव्य लवाजमा भगव्या पताका सह सहभागी होता .तर कोल्हापूर पंचक्रोशीतील तसेच हुपरीतील भजनी मंडळांनी टाळ-मृदंगाच्या गजरात फुगड्या खेळत विठ्ठलनामाचा जल्लोष निर्माण केला.
बिनखांबी गणेश मंदिर मार्गे दिंडी पुढे सरकत खंडोबा तालीम चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. खंडोबा देवासमोर माऊलींच्या अश्वाचे पूजन व भंडारा उधळून ‘उभे रिंगण’ पार पडले. त्यानंतर जुना वाशी नाका–राधानगरी रोडमार्गे संकल्प सिद्धी कारले येथे पालखीचा विसावा झाला.
त्यानंतर मैदानावर गोकुळचे माजी चेअरमन आबाजी पाटील आणि माजी नगरसेवक सारंगधर देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उभे रंग सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी नंदवाळकडे प्रस्थान झाली.सावली परिवाराच्यावतीने किशोर देशपांडे, गौरी देशपांडे, कुणाल देशपांडे आणि सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले.
विठ्ठल–रुक्माई तसेच संत बाळूमामा यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले वारकरी हे विशेष आकर्षण ठरले.चोपदार म्हणून वसंत पाटील व बापू पाटील यांनी आपली सेवा बजावली.
या अध्यात्मिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जयसिंग पाटील (चंद्रे), संजय सुतार (कळंबा), दामोदर पाटील (टिटवे), ओंकार सूर्यवंशी (तुरंबे), आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे, नागेश गुरव, शाम जोशी, रघुनाथ पाटील (वडकशिवाले), संभाजी पाटील, वासुदेव (कांडगाव), अजय चव्हाण आदींसह विविध गावांतील वारकरी मंडळे, तरुण मंडळे आणि महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला.फुलेवाडी, कसबा बावडा, तसेच कोल्हापूर उपनगरातील तरुण मंडळे आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. करवीर पोलीस ठाणे व वाहतूक विभागाच्या पथकाने चौकाचौकात उत्कृष्ट वाहतूक नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था राखली.