भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
schedule01 Nov 25 person by visibility 132 categoryराज्य
▪️गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे दोन दिवस होणार संविधानाचा जागर
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक ३ व ४ नोव्हेंबर या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचेगोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब,कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना १९४९ स्वीकारली व दि. २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना स्वीकारण्यात आली, जी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे जागर संविधानाचा हे भारतीय संविधानावर आधारित महानाट्य सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचा प्रयोग इप्सित एंटरटेनमेंट निर्मित संस्थेतर्फे सादर केला जाणार असून, रंगमंचावरील आणि रंगमंचामागील मिळून २५ कलाकारांचा सहभाग आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, प्रकाशयोजना, निर्मिती वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायं. ६ वाजता अलंकार फाउंडेशन प्रस्तुत संविधान चरित्रमाला या कार्यक्रमात संविधानावर आधारित गीतांचे सादरीकरण तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा जागर गीतांमधून सादर केला जाईल. याच दिवशी या कार्यक्रमात शाहीर डॉ. आझाद नाईकवडी व शाहीर रंगराव पाटील आणि संच या नामांकित कलावंतचे संविधान पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे.
या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या माहितीपूर्ण ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, बिभीषण चवरे यांनी केले आहे