डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांकडून ‘अँटीफंगल नेल लॅकर’ विकसित
schedule09 Dec 25 person by visibility 50 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : नखांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग, विशेषतः कॅंडिडल ओनिकोमायकोसिस या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधकांनी नवीन अँटीफंगल नेल लॅकर विकसित केला आहे.
नखांमधील बुरशीजन्य संसर्गावर वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग अधिक क्लिष्ट व वेदनादायी ठरतो. नखांचा रंग बदलणे, नखे जाड होणे, तडे जाणे, वेदना व सूज अशी लक्षणे दिसतात. मधुमेह, दीर्घकालीन अँटिबायोटिक थेरपी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग अधिक गंभीर होतो.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज अंतर्गत मेडिकल बायोटेक्नॉलॉजी व स्टेम सेल अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन विभागातील प्राध्यापक डॉ. संकुनी मोहन करूपाइल, प्राध्यापक डॉ. अभिनंदन पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. अश्विनी काळे आणि संशोधक विद्यार्थिनी डॉ. शिवानी पाटील यांनी अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या समस्येवर अभ्यास करून हे संशोधन पूर्ण केले.
या लॅकरमध्ये नैसर्गिकरित्या मोहरी व क्रूसिफरसी वनस्पतींमध्ये आढळणारे अॅलिल आयसोथायोसायनेट (AITC) हे संयुग वापरण्यात आले आहे. त्याचे अँटीफंगल गुणधर्म नखांमध्ये खोलवर प्रवेश करून कॅंडिडा बुरशीची वाढ थांबवण्यात परिणामकारक दिसून आले आहेत. यामुळे नखे पुन्हा मजबूत होणे, उपचाराचा कालावधी कमी होणे आणि रोजच्या औषधांची गरज कमी होते.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार हा लॅकर दीर्घकाल टिकणारा,कमीखर्चीक, सुरक्षित आणि संसर्गग्रस्त नखांमध्ये खोलवर प्रवेश करू शकणारा असल्याने भविष्यात कॅंडिडल ओनिकोमायकोसिसच्या उपचारात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो. या संशोधनावर आधारित पेटंटसाठीही अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.