कोल्हापुरात माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
schedule07 Dec 25 person by visibility 302 categoryराजकीय
▪️कोल्हापुरात शिवसेनेचा कॉंग्रेसला पुन्हा जोरदार धक्का
ठाणे : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक जोरदार धक्का कॉंग्रेसला दिला आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत स्वागत केले. या पक्ष प्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.
माजी महापौर सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्या माजी कृषी मंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, कोल्हापुरातील गोरगरीब जनतेला न्याय देणारे एक प्रकारे खाजगी कोर्ट असणारे जेष्ठ नेते कै.महिपतराव बोंद्रे यांची कन्या, कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार कै.सखाराम बापू खराडे यांच्या स्नुषा आहेत.
तर सई खराडे व श्री.अजित खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे सद्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्यासह यांचा जाहीर प्रवेश माजी महापौर को.म.न.पा. व सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार अॅड.श्री.महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव व सन २०१० साली महापालिका निवडणूकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर हे उपस्थित होते.