SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर (IRE) प्रोग्रामचा प्रारंभ हरिनामाच्या गजरात कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ ‘कार्तिकी दिंडी’ सोहळा उत्साहात दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित; सचिव तुकाराम मुंढे यांची माहितीतिसऱ्या टी-२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने केला पराभवLVM3-M5 रॉकेट: इस्रोने इतिहास रचला, श्रीहरिकोटा येथून 'बाहुबली'चे प्रक्षेपणनाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसादबालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फतच आयोजनसुधारित अनुदान योजनेसाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसंतांचे विचार आणि वारकरी परंपरा समाजाला ऊर्जा देणारी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पांडुरंगचरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे!

जाहिरात

 

बळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पांडुरंगचरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे!

schedule02 Nov 25 person by visibility 129 categoryराज्य

▪️पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील मानाचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान
▪️उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
▪️शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, णवारकरी हाच व्हिआयपी, मानाच्या वारकऱ्यांना एसटीचा मोफत पास कायमस्वरुपी, प्रशासनाने दर्शन मंडपाचे काम जलदगतीने पूर्ण करावे

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कार्तिकी यात्रा 2025च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर, सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट आलेले आहे. शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने 32 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समितीची स्थापना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे पांडुरंगाला घातले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळ मार्फत मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीने प्रवास करण्यासाठी मोफत पास दिला जातो. यापुढील काळात या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्ष राहील असा करार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हे नंबर 161 मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात नगर विकास विभागाला सादर करावा, याबाबतचाही निर्णय तात्काळ घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

आपल्या राज्याने सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांकावर राहावे, विविध कल्याणकारी योजनाची प्रभावी अंमलबजावणी करून राज्याच्या विकासाची पताका सर्वत्र फडकावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याप्रमाणेच चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगून राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मानाच्या वारकऱ्यांचे अभिनंदन केले व या यात्रा कालावधीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार व स्थानिक प्रशासन यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. दरम्यान यावर्षीपासून प्रथमच शालेय विद्यार्थ्यांचीही मानाचे मानकरी म्हणून निवड करण्यात आली. मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात यांना हा मान मिळाला.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशिलाबाई वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तयार केलेल्या दैनंदिनी 2026 चे प्रकाशन करण्यात आले.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्ताविक केले तर कार्यकारी अधिकारी  राजेंद्र शेळके यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes