ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र-कर्नाटक महामार्गावरच ठिय्या; पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
schedule01 Nov 25 person by visibility 181 categoryसामाजिक
कोल्हापूर : कर्नाटकमध्ये १ नोव्हेंबररोजी राज्योत्सव साजरा होतो, तेव्हा महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. आज शनिवारी शिवसैनिक कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना कर्नाटक पोलिसांनी कागल येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून पुढे जाण्यास बंदी घातली. सीमेवरती मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाट्यासह बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, अनेक शिवसैनिक कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना यावेळी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
आज सकाळी दूधगंगा नदी पुलाजवळ, महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवर ठाकरे गटाचे नेते विजय देवणे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आला. उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, प्रकाश पाटील यांच्या सह एकूण १४ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच संभाजी भोकरे यांच्यासह आणखी सहा शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्यासह कार्यकर्ते कर्नाटक हद्दीत जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना देखील अडवले. त्यांनी दूधगंगा नदीच्या पुलाजवळ हायवेवर ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. कर्नाटक तसेच कागल पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या हक्काचा उल्लेख करत कर्नाटकात जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले.
यावेळी कर्नाटक सरकारकडून चाललेल्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. काही काळ वातावरण तंग बनले होते. कर्नाटक सरकार विरोधात घोषणा बाजीने परिसर दुमदुमून सोडला होता.