संतांचे विचार आणि वारकरी परंपरा समाजाला ऊर्जा देणारी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule02 Nov 25 person by visibility 64 category
▪️शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण
पंढरपूर : वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, संस्था प्रमुख दादा महाराज मोरे माऊली, स्वामी अमृता आश्रम महाराज, चकोर महास्वामी बाविस्कर, हभप अक्षय भोसले महाराज, सरपंच जयलक्ष्मी माने व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आषाढी दिंडी अनुदान, विमा योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. हे राज्य संत, वीर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री संत मोरे परिवाराच्या वारकरी परंपरेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, हे सरकार शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात असलेल्या जनतेच्या मदतीला तत्परतेने धावून जाण्याची आमची भूमिका आहे.
प्रारंभी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते श्री संत मोरे माऊली महाराज यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन तर भक्तनिवास क्र. 1 चे लोकार्पण रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले.