तावडे हॉटेल नजीक घडलेल्या फसवणूकीतील 25.53 लाख रु. घेवून जाणाऱ्या एकाविरुद्ध गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
schedule13 Nov 24 person by visibility 139 categoryगुन्हे
▪️ फसवणूक करताना दक्षता अधिकारी (व्हिजेलंस ऑफिसर) म्हणून सांगितली होती ओळख
▪️ नागरिकांनी तपासणी पथकांना सहकार्य करावे, पथकांबाबत संशय आल्यास टोल फ्री 1950 क्रमांकावर खात्री करावी
कोल्हापूर : तावडे हॉटेल नजीक दि.12 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.10 वा फिर्यादी सुभाष हरणे यांचेकडील रोख रक्कम 25.53 लक्ष फसवणूक करून घेवून गेलेल्या 5 इसमांनी आपली ओळख दक्षता अधिकारी (व्हिजेलंस ऑफिसर) म्हणून सांगितली होती. या घटनेनंतर फिर्यादीकडून गांधीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने 5 जणांविरूद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच घडलेल्या घटनेबाबत पुढिल तपास सुरू आहे.
जिल्ह्यात निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने एकुण 44 स्थिर तपासणी पथके, 40 फिरती पथके आचारसंहितेचे पालन करण्यासाठी कार्यरत आहेत. दोन्ही प्रकारच्या पथकातील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक विभागाची ओळखपत्रही देण्यात आली आहेत. तसेच तपासणी वेळी संपुर्ण प्रक्रियेचे प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून व्हीडीओ चित्रीकरण केले जाते. इतर राज्यातून व जिल्ह्यातून प्रवेश करणाऱ्या संशयित वाहनांची स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी करताना चित्रीकरण करण्यात येते. भरारी पथकांकडूनही जिल्ह्यातील शहरांमध्ये व मोठ्या गावांमध्ये आचारसंहिता पालन होत असल्याची खात्री केली जात आहे. ही प्रक्रिया राबवित असताना शासकीय वाहनांचा वापर केला जातो व तशी नोंद त्यांच्याकडे असते.
नागरिकांनी याअनुषंगाने संबंधित पथकांना तपासणी करताना आवश्यक सहकार्य करावे. मात्र पथकांबाबत काही शंका आल्यास याबाबत निवडणूक विभागाच्या टोल फ्री 1950 या क्रमांकावर पथकाची खात्री करावी. तसेच पोलीस विभागाच्या 112 या क्रमांकावरून गरज पडल्यास आवश्यक मदत घ्यावी असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी अशा अनोळखी व फसवणूक करणाऱ्या पथकांपासून सावध राहावे व शंका असल्यास लगेच 1950 या नंबरहून आवश्यक खात्री करावी तसेच 112 या पोलीस मदत क्रमांकावरून मदत घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.