धन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगे
schedule20 Nov 24 person by visibility 128 categoryराज्य
▪️किरकोळ वादाचे प्रकार वगळता दहाही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत
▪️मतमोजणीसाठीही सर्व विधानसभा मतदारसंघात तयारीला वेग
कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायं. 5 वाजेपर्यंत 67.97 टक्के मतदान झाले. ही आकडेवारी राज्यात अग्रस्थानी राहीली. धन्यवाद कोल्हापूर म्हणत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने नागरिक, विद्यार्थी, मतदार यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती अभियान राबविले, त्याचाच परिणाम एकुण झालेल्या मतदान टक्केवारत दिसून आला. प्रशासनाकडून यावेळी मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान टक्केवारीपेक्षा अधिक मतदानाचे उद्दीष्ट ठेवले होते. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्य केलेल्या मतदान केंद्रावरील सर्व टीमचे, सर्व निवडणूक अधिकारी व त्यांची टीम, सर्व नोडल अधिकारी व त्यांची टीम तसेच शासनाच्या सहभागी प्रत्येक विभागाचे आभार जिल्हाधिकारी येडगे यांनी मानले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती दिली. यावेळी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, आज झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व ठिकाणी मतदारांनी शांततेत आणि उत्साहाने सहभाग नोंदविला. काही ठिकाणी मतदान यंत्रात बटण प्रेस न होणे, क्लॉक एरर अशा कारणांनी 19 बॅलेट युनिट, 23 कंट्रोल युनिट व 29 व्हीव्हीपॅट वेगवेगळ्या ठिकाणी बदलण्यात आले. मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात सायंकाळी उशिरापर्यंत पाहायला मिळाली. मतदान संपण्याच्या कालावधीवेळी 6 वाजे नंतरही दोनशेहून अधिक मतदान केंद्रात रांगा पाहायला मिळाल्या. सर्व उपस्थित मतदारांना टोकन देवून त्यांचेही मतदान उशिरापर्यंत थांबून घेण्यात आले.
▪️मतदान जनजागृतीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड
मतदार जनजागृतीसाठी नोडल अधिकारी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी चांगले नियोजन केले. जिल्हाभर विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी वाडी, वस्ती, गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून प्रशासनाला नागरिकांमधून सर्व स्तरातून साथ मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवर आल्याचे दिसले.
▪️मतदान शांततेत, कुठेही दखलपात्र गुन्हे नाहीत, सोशल मीडियावरील मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याच्या तीन घटना – पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित
जिल्ह्यात झालेल्या मतदानावेळी कुठेही दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली नाही. सर्व प्रक्रिया किरकोळ वादविवाद वगळता अतिशय शांततेत पार पडल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. मतदान केंद्रावरील तीन जाणांनी सोशल मीडियावर मतदान केल्याचे व्हिडिओ पोस्ट करीत मतदान गोपनीयतेचा भंग केला. याबाबत एक जणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून इतर दोघांचा तपास सुरू आहे. उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असलेल्या मतदान केंद्रावरील सुरक्षिततेची काळजी घेत सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये आणण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यानंतर सर्व 10 स्ट्राँग रूममध्ये तिहेरी सुरक्षेत सर्व मतदान यंत्र बंद करण्यत येणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.
▪️मतमोजणीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघात तयारीला वेग
सर्व दहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 144 टेबल असणार आहेत. जिल्हयात सर्व मिळूण 158 मतमोजणी निरीक्षक, 158 मतमोजणी सहायक, 158 मायक्रो ऑब्जर्व्हर तर सेवकही 158 असणार आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी 10 मतमोजणी केंद्रांमध्ये मिळून 123 टेबल असणार आहेत. त्यासाठी 123 मतमोजणी निरीक्षक, 123 मतमोजणी सहायक, 246 सेवक सहायक तर 123 मायक्रो ऑब्जर्व्हर असणार आहेत. ईटीपीबीएस मतमोजणीसाठी जिल्ह्यात 216 टेबल असून 237 मतमोजणी कर्मचारी असणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि वेळेत संपविण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले.