रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअरमध्ये मोठी घसरण
schedule08 Nov 24 person by visibility 157 categoryउद्योग
मुंबई : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स NU BESS लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी घातल्यामुळे आता अनिल अंबानी यांना धक्का बसला आहे. निविदेत सहभागी होण्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीतर्फे बोगस कागदपत्र सादर केली गेली, यासाठी त्यांच्या कंपन्यांवर ही कारवाई होत असल्याचे निवेदन सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे.
महाराष्ट्र एनर्जी जेनरेशन लिमिटेड ज्याचे नाव आता रिलायन्स NU BESS लिमिटेड असे आहे. विदेशी बँकाद्वारे अर्नेस्ट मनीसाठी जी बँक गँरंटी देण्यात आली होती, ती बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, निविदा भरणारी कंपनी मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असल्यामुळे त्यांनी मूळ कंपनीच्या ताकदीचा वापर करून आर्थिक पात्रता पूर्ण केल्या होत्या. जेव्हा या प्रकरणाची तपशीलवार तपासणी करण्यात आली तेव्हा आढळले की, रिलायन्स NU BESS ने घेतलेले सर्व निर्णय हे त्यांची पालक कंपनी रिलायन्स पॉवरच्या सल्ल्यानुसार घेतले होते.
या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर कंपनीकडून उत्तर देण्यात आले आहे. ही अनावश्यक कारवाई असून आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र रिलायन्स पॉवरवर आता निविदेत भाग घेण्यापासून रोखल्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.