मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना
schedule27 Sep 24 person by visibility 335 categoryआरोग्य
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे.
26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादी देखील दिली आहे. जारी केलेल्या निर्देशामध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश केला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे. 2005च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे.
राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर ही आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
मंकीपॉक्स क्लेड 1 चे लक्षणे क्लेड 2 सारखीच असली तरी, क्लेड 1 मध्ये जटिलतांचा धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.