देशभक्त व शिक्षणप्रेमी मौलाना अबुल कलाम आझाद यांची पत्रकारिता
schedule12 Nov 24 person by visibility 153 categoryसामाजिक
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्त व स्वातंत्र्यवीर सहभागी होते. भारतमातेला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.अशा या प्रखर लढ्यातील एक शूर लढवय्ये, थोर देशभक्त व क्रांतीवीर म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर रोजी नुकताच जन्मदिन झाला त्यानिमित्ताने.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी मक्का या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे 'वाचस्पती' ही त्यांची पदवी होती. पुढे 'आझाद’ (स्वतंत्र) ही त्यांना उपाधी मिळाली. वडिलांबरोबर १८९५ साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौलाना आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला. १८९९ ते १९०० या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या लिखाणांचे उर्दूत भाषांतर करायला सुरुवात केली. १९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले.
जनप्रबोधन व लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्त्याहून त्यांनी "अल्-हिलाल" हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या या साप्ताहिकामुळे उर्दू पत्रकारितेचा दर्जा सुधारला.अल्-हिलाल या साप्ताहिकासह इतर वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत होते . 'अल्-हिलाल' मधून त्यांचे परखड व प्रखर राजकीय विचार वाचून अनेक हिंदी मुस्लिम तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी चालना मिळाली. 'अल-हिलाल' मधील निर्भीड लिखाणामुळे त्यांच्यावर ब्रिटिश सरकारने खटला भरला व त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यातील लिखाणामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. मुस्लिम समाजातील तरुणांना सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांकडेच जाते. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला.
स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे; त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.
मौलाना आझाद शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत जागरूक होते. देशातील मुला मुलींना दर्जेदार व कौशल्यपूर्ण परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ते सातत्याने संघर्ष करीत असत. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात देशातील विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्याचे अत्यूच्य शिखर गाठले, याचे सारे श्रेय याचा पाया रचणारे मौलाना अबुल कलाम आझाद यानांच जाते.
मौलाना आझाद यांचे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे वाड्मयीन प्रतिष्ठेची अभिव्यक्ती होती. त्यांच्या पत्रकारितेचा अभ्यास करताना शिक्षणाबाबत व राष्ट्र प्रेमाबद्दल त्यांच्या अंतःकरणात असणारी आस्था व तळमळ प्रकर्षाने जाणवते.
✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)