राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लजकडून 4 लाख 5 हजार रुपयांचे वाहनासह मद्य जप्त; 1 लाख 5 हजार 470 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा
schedule12 Nov 24 person by visibility 160 categoryगुन्हे
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लज कार्यालयाकडून वाहनासह 4 लाख 5 हजार 470 रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 1 लाख 5 हजार 470 रुपये असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात यांनी दिली आहे.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज या पथकास दिनांक 12 नोव्हेंबर रोजी बातमी मिळाली की, गाव मौजे तुडीये तालुका चंदगड येथील प्रकाश तुकाराम गुरव या इसमाने त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेल्या सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन क्रमांक MH-१२-DE-२९७१ या वाहनात दारूचा साठा ठेवला आहे, प्रकाश तुकाराम गुरव या इसमाच्या राहत्या घराजवळ जावून दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा घातला असता त्यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेल्या वाहनामध्ये वेगवेगळ्या बॅण्डचे देशी व विदेशी मद्याचे एकूण ३४ बॉक्स मिळून आले. १ लाख ५ हजार ४७० रुपयांची मद्याची किंमत असून वाहनासहीत एकूण जप्त मुद्देमालाची ४ लाख ५ हजार ४७० रुपयांची आहे.
या प्रकरणी स्विफ्ट कारमध्ये मिळून आलेल्या प्रकाश तुकाराम गुरव या इसमाकडे सदर मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी हा मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे सांगितले. बेकायदेशीररीत्या अवैद्य देशी व विदेशी मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून प्रकाश तुकाराम गुरव या इसमावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयांत गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतीरिक्त त्याच्या इतर साथीदारचा सहभाग आहे का? तसेच या मद्याचा कोठे पुरवठा केला जाणार होता, याबाबतचा तपास सुरु आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात, सर्व दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, संदिप जाधव, स्वप्नील पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, सर्व जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत स्वप्नाली बेडगे, जवान-नि-वाहनचालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक दिवाकर वायदंडे करीत आहेत.