राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्त्ती
schedule19 Oct 24 person by visibility 308 categoryदेश
नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.
महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा विजया रहाटकर यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत.