कोल्हापूरकरांना आणखी चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध- डॉ. संजय डी. पाटील; डीवायपी सिटी मॉल १० वा वर्धापनदिन उत्साहात
schedule27 Sep 25 person by visibility 179 categoryउद्योग

कोल्हापूर : डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची ग्वाही डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी दिली. डी वाय पाटील सिटी मॉलच्या १० व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. पाटील यांच्याहस्ते डी वाय पी सिटीमध्ये १० वर्षापासून कार्यरत टेनंट, व्हेंडर, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या डी वाय पी सिटी मॉलचा दहावा वर्धापनदिन सोहळा हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्रोजेक्ट हेड डॉ. सदानंद सबनीस, आर्किटेक्ट संभाजी पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते केक कापून मॉलचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी डी वाय पी सिटी मॉलच्या प्रवासावर व्हिडिओ दाखवण्यात आला.
प्रास्ताविक सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांनी केले.यामध्ये त्यांनी मॉलच्या आजवरच्या यशस्वी वाटचाली बद्दल माहिती दिली. दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य मॉल म्हणून ओळख असलेला हा मॉल शंभर टक्के ऑक्युपाईड आहे याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ.संजय डी पाटील यांनी, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. कोल्हापूरकरांना फन, फूड, फॅशनचा आनंद देण्यासाठी या मॉलची निर्मिती केली. गेल्या १० वर्षात ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. टेनंट, व्हेंडरचे सहकार्य आणि प्रमाणिक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची साथ यामुळे दहा वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे. मॉल आणखीन ७५ हजार स्केअर फूट विस्तार करत आहोत. याठिकाणी कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यावर आमचा भर राहील.
विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, डी वाय पी सिटी मॉल फायदेशीर ठरणार नाही असा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र, डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरवल. आज १० वर्षात प्रतिसाद सतत वाढत आहे. लवकरच रौप्य महोत्सवही थाटात साजरा करू.
प्रोजेक्ट हेड डॉ. सदानंद सबनीस म्हणाले, डॉ संजय डी. पाटील यांनी देश विदेशात फिरून बारकावे, निरीक्षण करून यामाध्यमातून त्यातल्या चांगल्या गोष्टी कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आर्किटेक्ट संभाजी पाटील यांनी सयाजी हॉटेलच्या प्रस्तावित नव्या तेवीस मजली इमारत आणि विस्तारित डी वाय पी सिटी मॉलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
यावेळी शॉपर स्टॉपचे रवींद्र कांबळे, पीव्हीआरचे प्रमोद पिंगळे, विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर डी वाय पी सिटी मॉलमध्ये दहा वर्षांपासून कार्यरत टेनंट, व्हेंडर, कर्मचारी, तसेच उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. सुनंदा शिंदे यांनी केले तर आभार निखिल यादव यांनी मानले. यावेळी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतीश पावसकर, हॉटेल सयाजीचे जनरल मॅनेजर मुकेश रक्षित, सीए अमितकुमार गावडे, ॲड. रोहन पाटील, कॉसमॉस बँकेचे अधिकारी वर्ग यांच्यासह सर्व टेनंट, व्हेंडर, कर्मचारी उपस्थित होते.
