कोल्हापूर शहरात ''एक तास एक साथ'' स्वच्छता मोहिम
schedule24 Sep 25 person by visibility 193 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान स्वच्छता ही सेवा २०२५ या पंधरवडा उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहरात ''एक तास एक साथ'' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांच्या आदेशाने राबविली जाणार आहे.
शहरातील अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व रूपांतर (CTU – Cleanliness Target Unit) करण्यासाठी दुर्लक्षित कचराकुंड्या, पर्यावरण, आरोग्य व स्वच्छतेला धोका निर्माण करणाऱ्या ठिकाणी विशेष श्रमदान मोहिम घेण्यात येणार आहे. गुरुवार, दि.25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत महापालिकेच्या आरोग्य विभागासह सर्व विभागांच्या वतीने ही मोहिम राबवली जाईल.
या उपक्रमात सासने ग्राऊंड समोरील ताराबाई उद्यान, भगवा चौक परिसर, श्री अंबाबाई मंदिर परिसर, राजाराम बंधारा परिसर व बिंदू चौक पार्किंग परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडणार आहे. तरी शहरातील स्वयंसेवी संस्था, तालिम मंडळे तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेत आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.