शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालय’
schedule03 Jan 26 person by visibility 193 categoryसामाजिक
▪️शैलजा जोशी यांच्याकडून ३५ लाख रुपयांची उदात्त देणगी; सामंजस्य करारावर स्वाक्षरी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जी. व्ही. जोशी यांच्या कुटुंबियांमध्ये विद्यापीठात ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मारक वनस्पती संग्रहालय’ (बॉटेनिकल म्युझियम) स्थापन करण्याबाबत काल (दि. २) सामंजस्य करार करण्यात आला.
या संग्रहालयाच्या स्थापनेसाठी प्रा. जोशी यांच्या पत्नी श्रीमती शैलजा गोविंद जोशी (वय ९२) यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून साठवलेले ३५ लाख रुपये विद्यापीठास देणगी देण्याचा उदात्त निर्णय घेतला. यातील २ लाख रुपयांचा पहिला हप्ता त्यांनी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. हा प्रसंग उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या हृद्य कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी पुण्याहून ऑनलाईन उपस्थित राहिले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने समाजातील विविध घटकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे नाते जोडले आहे. नागरिकांच्या दातृत्वातून लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह, विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका यांसारख्या वास्तू या परिसरात साकारल्या आहेत. डॉ. जोशी यांच्या कुटुंबियांचे दातृत्व त्याचेच एक आदर्श उदाहरण आहे. त्यांची अपेक्षापूर्ती होईल, अशा स्वरुपाचे उत्तम संग्रहालय विद्यापीठ विहीत मुदतीत साकारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी जोशी कुटुंबियांच्या दातृत्वाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या भावी पिढ्यांसाठी सदरचे संग्रहालय अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. डॉ. जोशी यांच्या स्मृती याद्वारे चिरंतन राहतील.
विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजाराम गुरव यांनी डॉ. जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन या सामंजस्य कराराची पार्श्वभूमी विषद केली. ते म्हणाले, डॉ. जी. व्ही. जोशी यांनी १९६७ ते १९८२ या कालावधीत सुमारे १५ वर्षे वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रभावी नेतृत्व केले. विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नावावर १०० हून अधिक शोधनिबंध असून त्यांच्या संशोधनामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. २४ जुलै १९८२ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. सुमारे ४३ वर्षांनंतर, मार्च २०२५ मध्ये शैलजा जोशी आणि त्यांच्या मुली मृणालिनी (अंजली) जोशी व मेघा जोशी यांनी वनस्पतीशास्त्र अधिविभागाला भेट देऊन प्रा. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनस्पती संग्रहालय स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच या सामंजस्य कराराची पूर्तता होत आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात शिक्षक, संशोधक, बॉटॅनिकल गार्डन, हार्बेरियम, ग्रंथालय आणि संग्रहालय या बाबींची आवश्यकता असते. शिवाजी विद्यापीठातील वनस्पती संग्रहालयाची कमतरता या सामंजस्य करारामुळे भरून निघाली असून अधिविभागाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.
भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, संशोधनाभिमुख व जनजागृती करणारे असे हे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा यावेळी शैलजा जोशी यांनी व्यक्त केली.
या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि शैलजा जोशी (मुंबई) यांच्यासह त्यांची कन्या अंजली अनिल पाठक (अमेरिका), मेघा गोविंद जोशी (अमेरिका) आणि पुत्र महेश गोविंद जोशी (अमेरिका) यांनी स्वाक्षरी केल्या.
▪️वनस्पती संग्रहालयात काय असेल?
या प्रस्तावित ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालया’त प्रा. जोशी यांचे जीवनकार्य, संशोधकीय योगदान, तसेच वनस्पतींच्या उत्क्रांतीपासून आधुनिक वनस्पतीशास्त्रातील प्रगतीची माहिती आकर्षक स्वरूपात मांडली जाणार आहे. यामध्ये कीटकभक्षी वनस्पती, दुर्मीळ व स्थानिक प्रजाती, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती, लाकडांचे प्रकार (झायलॅरियम), मसाले व सुगंधी वनस्पती, वनस्पती-प्राणी परस्परसंवाद, मॉडेल्स, छायाचित्रे, चित्रे व शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त अशा विविध घटकांचा समावेश असेल.
यावेळी या सामंजस्य करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. अधिविभाग प्रमुख डॉ. निखील गायकवाड यांनी स्वागत वष प्रास्ताविक केले, तर डॉ. स्वरुपा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास महेश जोशी, पूर्वी जोशी, साहील व मिहीर जोशी, डॉ. संदीप पाटील, माजी शिक्षक डॉ. पी.डी. चव्हाण, डॉ. बी.ए. कारदगे, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. एम.एम. डोंगरे, डॉ. एन.एस. चव्हाण आणि डॉ. एस.एस. कांबळे यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

