'अर्बनायझेशन' ठरला 'स्पार्क'चा मानकरी !
schedule03 Jan 26 person by visibility 138 categoryसामाजिक
▪️'एडिक्शन' ला दुसरा तर 'तहानलेला डेटा' चा तिसरा क्रमांक : राज्यस्तरीय स्पर्धेची सांगता
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टिवलमध्ये अहिल्यानगर येथील रोहित चौगुले दिग्दर्शित 'अर्बनायझेशन' या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला.
शिवाजी विद्यापीठाचा बी.ए.फिल्म मेकिंग विभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड व लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक अक्षय वास्कर दिग्दर्शित 'एडिक्शन' या लघुपटाला तर तृतीय क्रमांक राहुल माळी दिग्दर्शित 'तहानलेला डेटा' या माहितीपटाने मिळवला. 'शेखचिल्लीची कबर' या राजेंद्रकुमार कळुगडे दिग्दर्शित माहितीपटाला उत्तेजनार्थ क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या चारही पुरस्कार प्राप्त लघुपट आणि माहितीपटांचे वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
या चित्रपट महोत्सवामध्ये एकूण २६ माहितीपट आणि लघुपटांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. अनमोल कोठाडीया, माहितीपट तज्ञ डॉ. बापू चंदनशिवे व दिग्दर्शक मयूर कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या निकालाआधी परीक्षकांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी किर्लोस्करचे सीएसआर अधिकारी शरद आजगेकर, मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर, सिनेरसिक, विद्यार्थी उपस्थित होते.

