कोल्हापूर महानगरपालिका : थकीत पाणी बिलाच्या विलंब आकारामध्ये मिळणार मोठी सवलत, पण कालावधी....
schedule30 Jan 24 person by visibility 1029 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी जमा केल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने ही सवलत योजना जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये दि.१ ते २९ फेब्रुवारी २०२४ अखेर थकीत रक्कम एक रक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये ५० टक्के सवलत व दि.१ ते ३१ मार्च २०२४ अखेर थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
या सवलत योजनेत नागरीकांनी पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार चालू बिलासह थकीत रक्कम एकरक्कमी रोख, धनादेश, डीमांड ड्राफ्टद्वारे ऑनलाईन सिस्टीमद्वारे 100 टक्के भरलेनंतरच विलंब आकारामध्ये सवलत देण्यात येईल. हि रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेत रोखीने, धनादेश, धनाकर्ष त्याचप्रमाणे फोन-पे, गुगलपे, पेटीएम मोबाईल वॉलेटद्वारे भरता येणार आहे. तसेच महापालिकेच्या web.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारेही या सवलत योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2024 अखेर रात्री 11.00 पर्यन्तच राहील. या सवलत योजनेचा लाभ शासकीय कार्यालयांना देखील येणार आहे. या योजनेमध्ये धनादेशाद्वारे पावती केल्यानंतर धनादेश न वटलेस सदरची पावती रद्द करुन थकीत रक्कम पूर्ववत खातेवर वर्ग करण्यात येईल. त्यानंतर ग्राहकास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना हि सवलत योजना लागू राहणार नाही. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे त्या कालावधीचे कोणत्याही प्रकारचे प्रलंबीत असलेले अपील, पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन, न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबीत असल्यास ते विनाअट मागे घ्यावी लागेल. तरी या सवलत योजनेचा नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्याचा असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.