अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण
schedule01 Oct 25 person by visibility 136 categoryराज्य

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा (Interest Reimbursement) योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व Mentorship देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.
त्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने त्वरीत कार्यवाही सुरु करुन, उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नुकतेच वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.या वेबिनारमध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. उत्तम जातीच्या जनावरांची निवड दुग्धव्यवसायासाठी अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गाई-म्हशींची निवड कशी करावी, या बाबतचे मार्गदर्शन डॉ. माने यांनी केले. यामध्ये गीर, साहिवाल, जर्सी यांसारख्या देशी आणि विदेशी जातींची गायांची माहिती तसेच जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सांगून आर्थिक नियोजन, दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग याबद्दलही मार्गदर्शन केले.
या वेबिनार दरम्यान डॉ .माने यांनी लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या वेबीनारची विस्तृत माहिती महामंडळाच्या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे.
भविष्यात महामंडळाकडून विविध जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.