SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करार

जाहिरात

 

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत : डॉ. गौतम गवळी

schedule14 Apr 25 person by visibility 402 categoryसामाजिक

कोल्हापूर : समताधिष्ठित लोकशाहीकडे घेऊन जाणारे शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते, असे प्रतिपादन  ॲमिटी विद्यापीठाचे डेप्युटी प्र-कुलगुरू डॉ. गौतम गवळी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व कार्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गवळी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे ध्येय हे व्यक्तीमत्त्व पुनर्स्थापनेचे होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. सातत्याने शिकत राहणे, कालांतराने निरुपयोगी सोडून देणे आणि नव्याने नवीन ज्ञान संपादन करणे, हे त्यांच्या शिक्षणाचे सूत्र होते. विषमतेचे मूळ शोधणे आणि ती समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे, हे उद्दिष्ट घेऊन ते काम करीत होते. ते मूळ त्यांना येथील सामाजिक संरचनेमध्ये सापडले. त्यांचे गुरू प्रा. जॉन ड्युई यांनी या संरचनेत राहून ती बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. तर, बाबासाहेबांनी त्या संरचनेत गुरफटून न जाता त्यातून बाहेर पडूनच ती बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्या दिशेने प्रयत्नही केले.

बाबासाहेबांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवनकौशल्ये असल्याचे सांगून डॉ. गवळी म्हणाले, या कौशल्यांचा मानवी व्यक्तीमत्त्वात विकास होणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांचे मत होते. त्यासाठी त्यांनी चिकित्सक विचार, सृजनात्मक विचार, सौहार्दपूर्ण परस्परावलंबन, सर्वसमावेशी बहुसांस्कृतिक क्षमता, सकारात्मक सामाजीकरण आणि स्वाभिमान ही मूल्ये शिक्षणातून प्रत्येक भारतीयाच्या व्यक्तीमत्त्वात विकसित होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिक्षणाचे उपयोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महामानवांची प्रतीके, प्रतिरुपे ही प्रेरणादायी असतात. मात्र, त्याच बरोबरीने त्यांच्या विचारांचा अंश आपल्या व्यक्तीमत्त्वात उतरवणे अधिक आवश्यक आहे. त्यासाठी चांगले व सकस वाचन, चांगली ग्रंथसंपदा असेल, तर उत्तम ज्ञानसंचय शक्य असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने प्रदूषणविरहित विचार आणि ज्ञान यांचा संचय आणि प्रसार करण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

▪️विद्यार्थ्यांची उत्साही संविधान रॅली आणि महामानवास अभिवादन
या कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरातून संविधान रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता. डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा नारळाच्या झावळ्या आणि फुलांनी सुशोभित केलेल्या बैलगाडीमध्ये ठेवण्यात आली होती. डॉ. आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी रॅलीचे नेतृत्व करीत होते. ढोल, ताशा आणि झांजपथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी लेझीमची प्रात्यक्षिकेही सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात संविधानाच्या प्रतिकृतीसह विविध संवैधानिक मूल्ये आणि कलमांचे फलक घेतले होते. संविधानाशी निगडित विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. रॅलीमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकारी, शिक्षक सहभागी झाले.

संविधान रॅली मुख्य प्रशासकीय भवन येथे विसर्जित करण्यात आली. तेथे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. गौतम गवळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन विकास केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. ए.बी. कोळेकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. किशोर खिलारे, डॉ. तेजपाल मोहरेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes