निवडणूक आयोग भाजपाच्या फायद्यासाठी कार्यरत, लोकशाहीसाठी हे घातक : खासदार विशाल पाटील यांची टीका
schedule25 Jan 25 person by visibility 385 categoryराजकीय

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम रहावी असे काम अशी आमची भूमिका आहे. मात्र निवडणूक आयोग भाजपाच्या फायद्यासाठी काम करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर झालेल्या आंदोलनामध्ये खासदार विशाल पाटील सहभागी झाले होते.
पत्रकार बैठकीमध्ये खासदार विशाल पाटील म्हणाले की, निवडणुका या निष्पक्षपाती व पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे, ही संवैधानिक संस्था स्वायत्त आहे पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थामध्ये हस्तक्षेप केला आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निष्पक्षपातीपणे व पारदर्शकपणे झालेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला. लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या सहा महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात ५० लाख मतदार वाढले कसे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२०१९ ची निवडणूक २०२४ ची निवडणूक या पाच वर्षात ५ लाख मतदार वाढले होते. मग २०२४ साली लोकसभा व विधानसभा या सहा महिन्यातच ५० लाख मतदार कसे वाढले. वाढलेल्या मतांचा डेटा संशयास्पद असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले . विधानसभा मतदानादिवशी संध्याकाळी पाच नंतर वाढलेली ७६ लाख मते सुद्धा संशयास्पद आहेत. ही मते कशी वाढली याचे उत्तर निवडणूक आयोग आजही देऊ शकले नाही.
काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट दिसत आहे पण वाढीव मतदारांच्या वैधतेचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे वाढीव मतांचे पुरावे मागितले पण त्यांनी दिले नाहीत.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आम्ही मान्य केला आहे. मात्र आजही लोक आम्हाला विचारते हा निकाल असा कसा लागला. कारण लोकांच्या मनात आजही शंका आहे . आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये निवडणुका या पारदर्शक व्हाव्यात व या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहावा या दृष्टीने होण्याची गरज आहे.
या पत्रकार बैठकीस आमदार जयंत आसगावकर, सचिन चव्हाण, भारती पोवार, राहुल पाटील, आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.