कोल्हापुरात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाला महिलांचा उत्साहवर्धक प्रतिसाद
schedule25 Sep 25 person by visibility 137 categoryआरोग्य

▪️आज पर्यंत ७४ हजार ७३७ महिलांच्या आरोग्य तपासण्या
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जाणारे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” राष्ट्रीय अभियान कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ७४,७३७ महिलांनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला.
जिल्ह्यातील ८१ आरोग्य वर्धिनी केंद्रे, नगरपालिका आरोग्य केंद्रे आणि ४१३ उपकेंद्रांमार्फत १,९९३ शिबिरांमध्ये ५७,३१३ महिलांनी सामान्य तपासणी, तर १७,४२४ महिलांनी विशेष तज्ञांमार्फत तपासणी करून घेतली. यापैकी ९,६०२ गरोदर मातांनी प्रसूतीपूर्व तपासणीचा लाभ घेतला. दररोज सरासरी ७०० महिला प्रत्येक शिबिरात सहभागी झाल्या.
या अभियानात रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, सिकल सेल, रक्तक्षय यांसारख्या तपासण्यांसह लसीकरण, समुपदेशन, स्थानिक आहार प्रोत्साहन, मासिक पाळी स्वच्छता, टेक-होम राशन, माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड, रक्तदान, अवयवदान नोंदणी आणि “निक्षय मित्र” स्वयंसेवक नोंदणी असे विविध उपक्रम राबवले गेले. महिलांना मोफत तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन मिळाले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना आवाहन केले की, घरातील प्रत्येक महिला व माता यांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेतून या सेवांचा लाभ घ्यावा. महिलांच्या उत्साही सहभागामुळे हे अभियान कोल्हापुरात यशस्वी ठरले असून, निरोगी आणि सशक्त समाजाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे अशी माहिती डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिली आहे.