वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये जननेंद्रिय क्षयरोगाची चाचणी; कोल्हापुरात दोनदिवसीय परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत
schedule12 Apr 25 person by visibility 299 categoryआरोग्य

कोल्हापूर : वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये जननेंद्रियाच्या क्षयरोगाची चाचणी करण्यावर परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत झाले. कोल्हापुरात इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शनच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांच्या नेतृत्वाखाली, वंध्यत्वातील एक गंभीर समस्या – महिलांमधील जननेंद्रिय क्षयरोगाच्या चाचण्या– या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील शनिवार व रविवार (ता. १२ व १३) असे दोनदिवसीय तज्ज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वरील विषयावर तज्ज्ञांचे एकमत झाले.
परिषदेमध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांनी एकत्र येऊन वंध्यत्व असलेल्या कोणत्या महिलांची जननेंद्रिय क्षयरोगासाठी चाचणी करावी? आणि या चाचण्या कोणत्या असाव्यात आणि त्या किती परिणामकारक आहेत? या दोन प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा झाली.
परिषदेमध्ये ‘मॉडिफाइड डेल्फी प्रक्रिया’ या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रक्रियेच्या आधारे एकमत साधले गेले. या निष्कर्षामुळे देशातील व जागतिक स्तरावरील लाखो महिलांना गर्भधारणा होण्याची संधी मिळू शकते. देशामध्ये स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जननेंद्रिय क्षयरोग. फुफ्फुसांच्या क्षयरोगाप्रमाणे याचे निदान सोपे नसते. गर्भाशय, अंडाशय व फॅलोपिअन ट्यूब्समध्ये हा संसर्ग अनेक वर्षे शांतपणे वाढत राहतो आणि गंभीर नुकसान करतो. काही वेळा ट्यूब्स पूर्णपणे बंद होतात ज्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीची गरज भासते. गर्भाशयाचे गंभीर नुकसान झाल्यास सरोगसीशिवाय पर्याय राहत नाही आणि अंडाशयाला मोठे नुकसान झाल्यास अंडाणू दानाची गरज भासते. या सर्व गोष्टी स्त्री व तिच्या कुटुंबावर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणाव आणतात. परंतु योग्य वेळी निदान झाल्यास हे सर्व टाळता येऊ शकते.
दरम्यान, परिषदेमध्ये डॉ. नलिनी कौल-महाजन (नवी दिल्ली), डॉ. उमेश जिंदल (चंदीगड), प्रा. जे. बी. शर्मा (नवी दिल्ली), डॉ. शोभना पट्टेड (बेळगाव), डॉ. देविका गुणशेला (बेंगळुरू), डॉ. चैतन्य शेंबेकर (नागपूर), • डॉ. रचना देशपांडे (ठाणे) यांच्याबरोबर इतर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ - डॉ. विकास ओसवाल (मुंबई) – फुफ्फुस तज्ज्ञ,
डॉ. सुमा कुमार (बेंगळुरू) – फुफ्फुस तज्ज्ञ, प्रा. मीना मिश्रा (नागपूर) – सूक्ष्मजैवशास्त्रज्ञ, डॉ. शरथ – सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, प्रा. दीपक मोदी (मुंबई) – संशोधन वैज्ञानिक, प्रा. नागासुमा चंद्रा (बेंगळुरू) – संशोधन वैज्ञानिक असे उपस्थित होते. तर निरीक्षक म्हणून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अधिकारी डॉ. रूपाली दळवी – शहर क्षयरोग वैद्यकीय अधिकारी व डॉ. चेतन हांडे – जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
▪️आयव्हीएफ व जननेंद्रिय क्षयरोग या दोन्ही क्षेत्रांमधील डॉ. पद्मा रेखा जिरगे यांचे योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. त्यांच्या पुढाकारामुळे ही परिषद देशातील प्रजनन आरोग्यसेवेमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
▪️परिषदेतील चर्चेवर आधारित तयार होणारा दस्तऐवज वंध्यत्वग्रस्त महिलांमध्ये जननेंद्रिय क्षयरोगाच्या वेळेवर निदान व उपचारासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे.