चंदगड तालुक्यात गोवा बनावटीची ७,४०,८८०/- रुपये किंमतीची दारु जप्त; एका आरोपीस अटक
schedule03 Nov 24 person by visibility 261 categoryगुन्हे
कोल्हापूर : गोवा बनावटीची ७,४०,८८०/- रुपये किंमतीची दारु जप्त, एका आरोपीस अटक करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेकडून करण्यात आली.
सध्या विधानसभा निवडणूका 2024 ची आचार संहिता सुरु झाली असून आगामी निवडणूका या खुल्या व भयमुक्त वातावणात पार पडाव्यात तसेच नागरीकांना कोणत्याही प्रलोभनांना, अमिषाला बळी पडू नये याकरीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असले अवैद्य व्यवसायाची माहिती काढुन परीणाम कारक कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व राजू कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पार्ले, ता. चंदगड गावचे हद्दीतील जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याचे शेडचे बाजूला उघडयावर गोवा बनावटीचे दारुचा साठा करून ठेवला असलेची माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने पार्ले, ता. चंदगड येथे जावून छापा कारवाई केली असता शिवाजी धाकलू गावडे वय ३८, रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर याचे कब्ज्यात ७,४०,८८०/-रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली. यातील इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारु महाराष्ट्र राज्याचा कर चुकविणेसाठी गोवा राज्यातून विक्री करणेसाठी आणली असलेची कबूली दिलेली आहे. सदरची दारु कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करणेत आलेली असून नमुद इसमाविरुध्द प्रोव्ही कायद्यान्वये चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करीता चंदगड पोलीस ठाणेच्या स्वाधीन करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, प्रकाश पाटील, दिपक घोरपडे, सागर चौगले व सुशील पाटील यांचे पथकाने केलेली आहे.