कोल्हापूर : घिसाड गल्ली परिसरात घराला भीषण आग; भाडेकरूंचे प्रापंचिक साहित्य आगीमध्ये खाक; फटाके गोडाऊन भस्मसात; सुमारे साठ लाखांचे नुकसान
schedule14 Mar 25 person by visibility 384 categoryगुन्हे

कोल्हापूर : सोमवार पेठ, देशभूषण हायस्कूल समोरील घिसाड गल्ली परिसरात घराला लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे साठ लाखांचे नुकसान झाले. या आगीमध्ये या घरामध्ये राहणाऱ्या पाच भाडेकरू कुटुंबाचे प्रापांचिक साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले. आज शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अग्निशमन विभागाला वर्दी मिळताच अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. एका भाडेकरूच्या घरामध्ये फटाक्याचे गोडाऊन असल्यामुळे आग जोरात पसरली. यामध्ये प्रापंचिक साहित्याचे मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी पहाटे आग लागल्याची वर्दी घर मालक संजय मुग यांनी अग्निशामक विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाला सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणता आली. घरामध्ये राहणारे भाडेकरून दस्तगीर मोमीन, अन्सार मुल्ला, जमीर पन्हाळकर, गणेश काळे, सुरेश चौगुले यांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले आहे . मालक संजय मूग यांच्याही काही साहित्य जळून नुकसान झाले. आगीमध्ये भाडेकरूंचे प्रापंचिक साहित्य यामध्ये फ्रिज घरातील गॅस, कपडे, महत्त्वाचे कागदपत्रे पैसे दागिने जळून खाक झाली.
गणेश काळे यांच्या पंधरा बाय दहाच्या खोलीमध्ये फटाक्याचे गोडाऊन असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशामक विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग सकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली.
आगीची घटना समजतात मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला व कांता बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक ड्रायव्हर अमोल पाटील, रघुनाथ साठे, योगेश जाधव, रमजान पटेल, चंद्रकांत पाटील, फायरमन गणेश टिपुगडे, सुशांत जोंधळे, अजित शिणगारे, पुंडलिक माने, निवास जाधव, पवन कांबळे, गिरीश गवळी, सौरव पाटील, सुभाष मगदूम, हर्षल माने, यांनी आग आटोक्यात आणली.