पेट्रोल, डिझेलचे दर पाच दिवसांत चौथ्यांदा वाढले
schedule26 Mar 22 person by visibility 1661 categoryदेश
नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा एकदा भाव वाढले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर ७६ ते ८४ पैशांनी तर डिझेल ७६ ते ८५ पैशांनी महागले आहे. गेल्या पाच दिवसांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अवघ्या पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांहून अधिक वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे.
दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८०-८० पैशांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत पेट्रोलची किंमत ९८.६१ रुपये प्रतिलिटर असेल, जी आधी ९७.८१ रुपये होती, तर डिझेलची किंमत ८९.०७ रुपये प्रति लिटरवरून ८९.८७ रुपये झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ८४ पैशांनी वाढून ११३.३५ रुपये आणि डिझेलचे दर ८५ पैशांनी वाढून ९७.५५ रुपये प्रतिलिटर झाले आहेत, तर कोलकात्यात पेट्रोल ८३ पैशांनी वाढून १०८.१ रुपये प्रतिलिटर झाले आहे. लिटर आणि डिझेल ७९ पैशांच्या वाढीनंतर ९३.०१ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७६ पैशांनी वाढून १०४.४३ रुपये आणि डिझेलचा दर ७६ पैशांनी वाढून ९४.४८ रुपये प्रति लिटर झाला आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर ११३.४२ रुपये, तर डिझेलचा दर ९६.२० रुपये प्रतिलिटर झाला आहे.
२२ मार्च रोजी देशात सुधारित दर जाहीर करताना सुमारे साडेचार महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.