कोल्हापुरात 25 रोजी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईची वस्तूस्थिती
schedule26 Sep 25 person by visibility 959 categoryगुन्हे

कोल्हापूर : पृथ्वीराज देसाई यांचे काम उपविभागीय अधिकारी कार्यालय करवीर या कार्यालयाकडून 4 जुलै 2025 रोजी पूर्ण झालेले आहे. याबाबत त्यांचे आदेश श्री. देसाई घेवून गेलेले आहेत. त्यामुळे श्री. देसाई यांचे कोणतेही काम उपविभागीय अधिकारी कार्यालय करवीर कार्यालयाकडे प्रलंबित नव्हते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून 25 सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, करवीर कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचे करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सांगितले आहे.
कारवाईबाबतची वस्तूस्थिती पुढीलप्रमाणे - पृथ्वीराज वसंतराव देसाई, रा.318, ई वॉर्ड, राम निवास, न्यु शाहुपूरी, कोल्हापूर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे ब-सत्ताप्रकार कमी होवून मिळण्याबाबत 7 फेब्रुवारी रोजी अर्ज दिला होता. अर्ज पुढील चौकशी व अहवालाकरीता नगर भूमापन अधिकारी करवीर कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. या कार्यालयाकडून अंतिम आदेश 4 जुलै 2025 रोजी पारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार पृथ्वीराज वसंतराव देसाई हे स्वतः उपविभागीय अधिकारी करवीर कार्यालयामध्ये 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता उपस्थित राहून आदेशाबाबत त्रयस्त व्यक्ती पैशाची मागणी करत असून त्रास देत आहे असे सांगितले. त्याबाबतचे देसाई यांच्याकडून लेखी म्हणणे नोंदविण्यात आले. उप विभागीय कार्यालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागास 25 सप्टेंबर रोजी पत्र देवून तात्काळ चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच श्री. देसाई यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास तात्काळ तक्रार करण्यास कळविण्यात आले.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामासाठी कोणतीही त्रयस्त व्यक्ती पैशांची मागणी करत असल्यास त्यास बळी पडू नये. तसेच स्वतः अर्ज दाखल करावेत. त्यामध्ये कोणत्याही कामामध्ये शंका असल्यास समक्ष अधिकारी यांना भेटून शंका निरसन करुन घ्यावे. सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत अभ्यागताना भेटीसाठी वेळ देण्यात आली असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.