“स्वस्थ्य नारी सशक्त परिवार” अंतर्गत हुपरी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
schedule25 Sep 25 person by visibility 90 categoryआरोग्य

कोल्हापूर : स्वस्थ्य नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी, ता. हातकणंगले येथे नुकतेच मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, गरोदर मातांची तपासणी, मानसिक आजार समुपदेशन, कुष्ठरोगाविषयी तपासणी व आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. तसेच दमा , इतर विकार, एच. आय. व्ही., लैंगिक आजार ( स्त्री व पुरुष) या बाबत माहिती, समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले तसेच मौखिक - जलजन्य आजाराविषयी आरोग्य शिक्षण व औषधोपचार देण्यात आले. हिवताप (मलेरिया), किशोरवयीन (10 ते 19 वयोगट) मुलांचे व मुलींचे आरोग्याबाबत समुपदेशन व सल्ला, क्षयरोग विषयी माहिती व क्षयरोग टाळण्यासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या. लहान बालकांमधील कुपोषण टाळण्यासाठी पोषक आहाराविषयी मार्गदर्शन, योग शिबिर घेऊन, शिबिरार्थींना योगाचे आयुष्यातील महत्त्व तसेच आभा व आयुष्यमान कार्ड शिबिर घेऊन आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. त्याचबरोबर व्यसनमुक्ती विषयी समुपदेशन करण्यात आले. मद्यपान व धूम्रपान यांचे दुष्परिणाम सांगण्यात आले, तंबाखू गुटखा न खाण्याचा सल्ला देण्यात आला.
शिबिरामध्ये एकूण 546 महिलांची तपासणी करण्यात आली व उपचार देण्यात आले. 546 पैकी 106 गरोदर मातांना रक्तक्षय प्रतिबंधक आयर्न व फॉलिक ॲसिड तसेच कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या. तसेच 69 लहान बालके 101 पुरुष व 128 किशोरवयीन मुलींची तपासणी असे एकूण 844 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन सुभाष गोटखिंडे, बाळासाहेब रणदिवे, सुरज बेडगे, किरण कांबळे व मंगलराव माळगे यांच्या हस्ते संयुक्तरित्या करण्यात आले.
शिबिराची प्रस्तावना डॉ. प्रियांका जाधव - केखलेकर यांनी तर आभार डॉ.वसुंधरा देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले.
शिबिराकरिता सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी मठाची टीम, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. स्वप्नील हुपरीकर, श्रद्धा हॉस्पिटल हुपरीचे डॉ. श्रद्धा मिरजकर, महालक्ष्मी हॉस्पिटल हुपरीचे डॉ. सागर गिरी, तसेच ओंकार हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. सुधीर पोतदार यांनी योगदान दिले.
या शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार , डॉ. प्रकाश गिरी, एकात्मिक बाल विकास विभागाच्या श्रेया लगारे, बिस्मिल्ला फाउंडेशनचे महेबूब मुजावर व त्यांचे सहकारी . रयत शिक्षण संस्था हुपरी च्या 1998 बॅचचे माजी विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक - आशा कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .