निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले
schedule07 Dec 24 person by visibility 247 categoryसामाजिक
कोल्हापूर : चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमाने राबवली पाहीजे, असे आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झालेल्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. किरण आणि अनघा पुरंदरे या दांपत्याचा जीवन प्रवास, त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून, श्रोते अक्षरशः भारावून गेले.
गेल्या ३० वर्षाहून अधिककाळ, किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करतायत. भंडारा जिल्हयातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल गावात राहणार्या पुरंदरे दांपत्याने, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय. शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करत, त्यांच्या पारंपारिक कलांना चालना देतायत. मुळचे पुण्याचे पुरंदरे दांपत्य, आता पुर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, शुक्रवारी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी.एस. शिंपुकडे यांच्या उपस्थितीत, पुरंदरे यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन पत्रकार अश्विनी टेंबे यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना, पुरंदरे यांनी पीटेझरी- निसर्ग आणि संस्कृतीचा प्रितीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिले. त्यातून त्यांची तळमळ दिसून आली. गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय. या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे, मग माणूस अधिकार गाजवू शकतो. पृथ्वीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचे आहे.
निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीव पूर्वक काम करावं, असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं. दरम्यान कोल्हापूरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दांपत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रूपयांचा निधी दिला. तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दांपत्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र पोंदे, मनिषा चव्हाण, ज्योती तेंडुलकर, अनिता जनवाडकर, ॠषिकेश जाधव, मिनल भावसार, सोनाली चौधरी, ज्योती रेड्डी, जगदिश चव्हाण, अमोल देशपांडे, भाग्यश्री देशपांडे, करूणाकर नायक, भारती नायक, अनुपमा खटावकर, प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.