चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी विविध सुविधा
schedule11 Apr 25 person by visibility 366 categoryमहानगरपालिका

▪️महालक्ष्मी रथोत्सव मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क सुरु
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा यात्रा 2025 निमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी वैद्यकिय मदत कक्ष, अग्निशमन मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने पंचगंगा घाट परिसराची दैनंदिन स्वच्छता दोन शिफ्टमध्ये 26 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नदीमध्ये बचाव कार्यासाठी एक बोट, फायर फायटर 13 अग्निशमन जवानांसह तैनात करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सकाळी पाहणी केली.
यावेळी मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर श्री महालक्ष्मी रथोत्सव सोहळा रविवार दि.15 एप्रिल 2025 रोजी असल्याने महालक्ष्मी रथोत्सव मार्गाचीही आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी पाहणी केली.
यावेळी उपशहर अभियंता सुरेश पाटील, देवस्थान समितीचे सचिव सेक्रेटरी शिवराज नायकवडी, कनिष्ठ अभियंता निवास पोवार उपस्थित होते. या रोडवरील पॅचवर्कची कामे आज तातडीने विभागीय कार्यालय मार्फत सुरु करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत या मार्गावरील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क पुर्ण करण्यात येणार आहे.