कोल्हापूर जिल्ह्यात आता आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालय गुगलवर
schedule01 Oct 25 person by visibility 165 categoryराज्य

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाला यश मिळाले आहे. राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून (१७ सप्टेंबर २०२५) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर २०२५) राबविल्या जाणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर अद्ययावत करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सात नाविन्यपूर्ण उपक्रम निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगलवर नोंदवणे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८५८ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी ६४८ केंद्रांचे आणि ४८३ तलाठी कार्यालयांपैकी २८९ कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर यशस्वीपणे अद्ययावत करण्यात आले आहे. उर्वरित केंद्रांचे आणि कार्यालयांचे लोकेशन नोंदवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयांचे नेमके स्थान माहीत नसल्याने अनेकदा नागरिकांना या केंद्रांमार्फत मिळणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यास अडचणी येत होत्या. आता गुगल नकाशावर या केंद्रांचे लोकेशन उपलब्ध झाल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील तसेच परगावी असलेल्या नागरिकांना या सेवांचा सहज लाभ घेता येणार आहे. हा उपक्रम विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तरुण पिढीला आणि बाहेरील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.
महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार (क्र. मराअ-२०२५/प्र.क्र. ६३, दिनांक १ सप्टेंबर २०२५) हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याने हा डिजिटल पाऊल उचलत नागरिकांच्या सोयीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
उर्वरित आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयांचे लोकेशन अद्ययावत करण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्हा डिजिटल प्रशासनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे शासकीय सेवांना अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.