विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालक शिक्षक सुसंवाद गरजेचा प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे
schedule30 Sep 25 person by visibility 153 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : मोबाईल व समाज माध्यमाच्या अति आहारी गेल्यामुळे आजचे विद्यार्थी दिशाहीन होत आहेत. विद्यार्थी हे समाजाचे भविष्य आहेत. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांच्यावर शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व्हावेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध घडवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या घडीला पालक शिक्षक सुसंवाद गरजेचा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे यांनी केले.
येथील भवानी मंडपातील शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष असणाऱ्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमधील ऐतिहासिक सभागृहात झालेल्या पालक-शिक्षक-विद्यार्थी सहविचार सभेत उपस्थित विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे हे बोलत होते.
११ वी व १२ वी वर्गाच्या दोन सत्रात संपन्न झालेल्या सहविचार सभेत पुढे बोलताना ते म्हणाले पालक सभा म्हणजे केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, आपल्या सर्वांच्या विचारांना प्रेरणा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा एक सोनेरी क्षण आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकां पुरते मर्यादित नाही, तर ते जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार करते. 'जिथे मेहनत आहे, तिथेच यश आहे,' या विचाराने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून मेहनतीने पुढे जायचे आहे. प्रशालेच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर राष्ट्र उभारणीसाठी योगदान दिलेले आहे. प्रशालेचा हाच वसा आणि वारसा विद्यार्थ्यांनी जोपासून समाज उन्नतीसाठी कार्य करावे असे सांगून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या सभेत शालेय प्रगती, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, सहशालेय उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा विषयी सविस्तर चर्चा झाली. पालकांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत सकारात्मक सूचना दिल्या. सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आपली मनोगत यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, विद्यार्थ्यांचा आहार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आणि समाजाभिमुख शिक्षण घडविण्यासाठी पालकांनी सजग राहावे.प्रा. बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.पी.माळवे, वर्ग शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थितीत होते.