कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे रमाई नर्सिंग कॉलेज आरोग्यसेवेची नवी दिशा ठरेल : भूषण पाटील
schedule29 Sep 25 person by visibility 236 categoryआरोग्य

कोल्हापूर : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज, कोल्हापूरतर्फे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग अभ्यासक्रम अधिकृतरीत्या सुरू होत आहे. त्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. उमरानी जे म्हणाल्या, राज्यातील कॅन्सरविरोधी मोहिमेला यामुळे नवे बळ मिळणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या धोरणांतर्गत तसेच डीएमईआर आणि एमएसबीएनपीईच्या मान्यतेने राबविण्यात आला आहे. कॅन्सर नर्सिंग प्रशिक्षण क्षेत्रात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अग्रणी राहिले आहे. नंतर महाराष्ट्रातील दुसरे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज उदयास आले आहे. ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे.
त्या म्हणाल्या, या कॉलेजला कोल्हापूर कॅन्सर सेंटर या पालक रुग्णालयाचा आधार असून, आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार यामुळे विद्यार्थ्यांना प्रगत प्रशिक्षण मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात दरवर्षी १.३ ते १.५ लाख नवीन कॅन्सर रुग्ण निदान होतात. राज्यभरातील ३६ जिल्हा रुग्णालये, ४०० हून अधिक उपजिल्हा व तालुका रुग्णालये, १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, तसेच हजारो प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमार्फत आरोग्य सेवा पुरविली जाते. इतक्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देताना विशेष प्रशिक्षित नर्सेसची तीव्र टंचाई भासत आहे. ती या कॉलेजमुळे थोडीफार सुसह्य होईल.
डॉ. सूरज पवार म्हणाले, हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत नर्सेससाठी एक सुवर्णसंधी आहे. शासकीय रुग्णालयातील नर्सेसना कॅन्सर उपचारातील तांत्रिक कौशल्य मिळेल. खासगी रुग्णालयातील नर्सेसना व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून त्यांच्या सेवेला आंतरराष्ट्रीय मानांकनचा दर्जा येईल. ग्रामीण भागातील नर्सेसदेखील या प्रशिक्षणामुळे कॅन्सर रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील. रुग्णांना मानसिक व भावनिक आधार देतील. कुटुंबीयांना समुपदेशन व मार्गदर्शन करतील.
डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या, या कॉलेजच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या कॅन्सरविरोधी मोहिमेला एक सक्षम आधार मिळणार आहे. प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा उंचावेल. कॅन्सर उपचाराचा दर्जा सुधारेल. समाजात कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण व कुटुंबीयांना नवी आशा मिळेल. रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज केवळ नर्सिंग प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता भविष्यात संशोधन, शैक्षणिक उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्येही आपले स्थान निर्माण करेल. सरकारच्या “आरोग्यदायी महाराष्ट्र, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र” या ध्येयपूर्तीसाठी या कॉलेजचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे असे डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ आर. एम. कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील यावेळी उपस्थित होते. प्राचार्य नागेश गुंडप यांनी आभार मानले.
▪️प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती :
अंतिम मुदत : ३० ऑक्टोबर २०२५
इच्छुक नर्सेसनी ही संधी साधून व्यावसायिक ऑन्कोलॉजी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
संपर्क : प्राचार्य, रमाई ऑन्कॉलॉजी नर्सिंग कॉलेज, कोल्हापूर. मो. ८५३०३३३०३६.
ई मेल - ramaionconursingclg@gmail.com