कोल्हापूर : विविध रंगांची उधळण करत युवकांसह अबालवृध्दांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. सप्तरंगांची उधळण, युवकांचा ओसंडून वाहणारा जल्लोष, संस्कृतीचे जतन अशी परिपूर्ण रंगपंचमी कोल्हापूर शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली.
शनिवारी सकाळपासून चिमुकल्यांसह अवघ्या युवकांनी विविध रंगांची उधळण करण्यास सुरुवात केली. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनीच रंगपंचमीचा आनंद लुटला. काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर कोरडे आणि आरोग्यास हानिकारक नसणाऱ्या रंगांच्या सहाय्याने रंगपंचमीचा पारंपरिक आनंद लुटण्यात आला. कोरड्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला
गेल्याने रस्तेही विविध रंगात न्हाऊन गेले होते. महिलाही रंगपंचमीचा आनंद लुटण्यास सरसावल्या होत्या.
महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी दुचाकीवरुन जाऊन मित्र-मैत्रिणींना रंगवत होते. कडक उन्ह असले तरी त्याची कोणतीही तमा न बाळगत बेभान होऊन युवा वर्ग रंगात न्हाऊन निघत होता.
युवकांनी मोटरसायकलीवरुन शहरातील मुख्य मार्गांवरुन रंगाची उधळण करीत रॅली काढत होते. शहरामध्ये काही संघटना, मंडळातर्फे सामुदायिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवती सहभागी झाल्या होत्या.
कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी माजी सैनिकांसमवेत रंगपंचमी साजरी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात माजी सैनिक व माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते.