कोरोनारुपी महामारीमुळे आलेली गेले दीड-पावणेदोन वर्षांची मरगळ झटकून सोमवारपासून प्रकाश पर्व सुरू झाले आहे. दिवाळीचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही SMP हे न्युज पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू करत आहोत.
गेले दीड-पावणेदोन वर्ष सारे जग कोरोनारुपी भीतीच्या सावटाखाली होते. भारतालाही याचा चांगलाच फटका बसला. यात महाराष्ट्र तर आघाडीवर होता. अनेकांनी जीव गमावला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सततच्या लॉक डाउनमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. उद्योग धंदे मान टाकू लागले. सप्टेंबरपासून दुसर्याय लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनलॉक झाल्याने उद्योग धंदे सुरू झाले असून, अर्थ व्यवस्था सावरू लागली आहे. लसीकरणातही आघाडी घेतल्याने संभावित तिसऱ्या लाटेची भीतीही जनतेच्या मनातून कमी झाली आहे. गणेशोत्सव, दसरा कोणत्याही विघ्नाविना पार पडले. आता प्रकाशाचा सण दिवाळी येत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तिमिरातुन तेजाकडे असा भास होत आहे. उद्योग धंद्यांची चक्रेही धाऊ लागली आहेत. मात्र, अजूनही काही धडपडत आहेत, वाट चुकत आहेत. अशांना दिशा दाखविण्यासाठी दिशादर्शकाची गरज असते. याच भूमिकेतून या प्रकाश पर्वात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर SMP न्युज हे पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाले.
निष्पक्ष, परखड बातमी देण्याबरोबरच आबालवृद्ध यांच्यासह तरुणाईच्या समस्या मांडण्यावर भर देण्याचा प्रयत्न असेल. करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत सहकार चांगलाच रुजला आहे. राजकीयदृष्ट्याही राज्यात कोल्हापूरने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. इथली कृषिसंपदा राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत अशी आहे. या सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या पोर्टलद्वारे केले जाईल. त्यासाठी गरज आहे कोल्हापूरकरांच्या पाठबळाची. ‘फक्त लढ म्हणा’ म्हणण्याची.