फुलेवाडी फायरस्टेशन अपघातातील जखमींना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून तत्परतेने मदत
schedule01 Oct 25 person by visibility 352 categoryराज्य

कोल्हापूर : फुलेवाडी येथील फायर स्टेशन बांधकामाचा स्लॅब कोसळून ५ कामगार जखमी झाले तर १ कामगाराचा मृत्यू झाला. जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या खाण्याची व्यवस्था शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, उपजिल्हाप्रमुख मनमोहन खोत यांनी घटनास्थळी धाव घेतला. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन लगेचच सीपीआर येथे जाऊन कोल्हापूर जिल्हा आरोग्य उपसंचालक दिलीप माने, महानगरपालिका आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा, जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांच्यासह जखमींच्या उपचाराची माहिती घेतली. साळुंखे यांनी सदर दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही दिली. यावेळी साळुंखे यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर देत योग्य ते उपचार मिळत असल्याची खात्री केली. दुर्घटनेनंतर रुग्णांना आणि नातेवाईकांना रुग्णालयात आणल्यानंतर रात्री १ वाजले तरी त्यांनी काहीही खाल्लेले नसलेले लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी जेवणाची व्यवस्था करून संवेदनशीलतेचे दर्शन घडले.