बिकानेर राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे घवघवीत यश
schedule12 Apr 25 person by visibility 208 categoryक्रीडा

कोल्हापूर : दि. १० ते १३ एप्रिल 2025 रोजी बिकानेर, राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करत १ रजत व १ कांस्य पदकाची कमाई केली. हनुमान यशवंत चोपडे याने पुरुष Mass Start (१०० कि.मी.) या चित्त थरारक अशा क्रीडा प्रकारात २.५७.१८ अशी वेळ नोंदवत, अतिशय प्रभावी कामगिरी करत कास्य पदक मिळवले.
तसेच महिला Criterium (३० कि.मी.) या क्रीडा प्रकारात योगेश्वरी महादेव कदम हिने अगदी शेवटच्या क्षणी गुजरातच्या खेळाडूस मागे टाकून (८ गुण) मिळवत रजत पदकावर आपले नाव कोरले. या शिवाय साक्षी तुकाराम पाटील हिने (६ गुण) मिळवत चतुर्थ क्रमांक पटकाविला. तब्बल बारा वर्षानंतर शिवाजी विद्यापीठाने अखिल भारतीय विद्यापीठ रोड सायकलिंग क्रीडा प्रकारात यश मिळवले आहे.
या संघचे प्रा. सुशीलकुमार गायकवाड हे प्रशिक्षक म्हणून तसेच प्रा. संतोष जाधव हे सहा. प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. प्रा. अजय मराठे यांच्याकडे संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी आहे. या संघास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी. शिर्के, प्र.कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे , क्रीडा अधिविभाग चे संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.