महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरू : गृहराज्यमंत्री योगेश कदम
schedule18 Mar 25 person by visibility 270 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्रात अवैधपणे राहणारे आणि घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, भास्कर जाधव, योगेश सागर, सुनील प्रभू, मनिषा चौधरी, अमित साटम आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती.
गृहराज्यमंत्री कदम म्हणाले की, महाराष्ट्रात अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध राज्यशासन आणि पोलिस विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत संशयित नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी अलीकडेच विविध भागांमध्ये छापे टाकून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे सर्वजण अवैधरित्या वास्तव्य करत होते. याआधी नालासोपारा परिसरात १३ बांगलादेशी नागरिक अटक करण्यात आले होते. या घुसखोरांनी पश्चिम बंगाल-बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश करून मुंबईत मजुरीचे काम सुरू केले होते. ठाणे शहर, निजामपूरा, मानपाडा आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिकांना भाड्याने घरं मिळवून देणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम साईटवर काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात आन्वा येथील स्टोन क्रशरवर तीन बांगलादेशी नागरिक मजुर म्हणून काम करताना आढळले, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १२ अंतर्गत कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळून आले. हे दोघे बिल्डिंग बांधकाम साईटवर काम करत होते. त्यांच्याविरुद्ध सीसीटीएनएस प्रणालीत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने नवी मुंबईतील बाळेगाव येथे २१३ क्षमतेचे कायदेशीर स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. याचे काम लवकरच पूर्ण होईल आणि तसेच नवीन ८० क्षमतेचे स्थानबद्ध केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाशी समन्वय सुरू आहे.
महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी थांबवण्यासाठी राज्यशासन सतर्क आहे असेही गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले.