आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मी
schedule03 Jan 26 person by visibility 160 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेची कडक व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
ताराबाई पार्क येथील मुख्य निवडणूक कार्यालयात आयोजित सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले की, सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली असून दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणापर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पोस्टल बॅलेटसाठी PB-1 अर्ज स्वीकारण्यात यावेत. दिनांक १० व ११ जानेवारी २०२६ रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मतदानासाठी आवश्यक यंत्रसामग्री दिनांक ७ व ८ जानेवारीपर्यंत पूर्णतः तयार करून ती स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच मतमोजणीसाठीचे प्रशिक्षण दिनांक १२ किंवा १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात यावी अशा सूचना दिल्या.
याशिवाय मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहनांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या काळात प्रचारात वेग येणार असल्याने विविध परवानग्या, आचारसंहिता कक्ष, तपासणी नाके व भरारी पथके अधिक सक्षम व कार्यक्षमपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही प्रशासकांनी दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, निवडणूक अधिकारी संदीप भंडारे, एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, सुशिल संसारे, हरेश सुळ, समीर शिंगटे, श्रीमती रुपाली चौगुले, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर उपस्थित होते.

