नांदणी येथील जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांसह तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देणार : मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस; अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू
schedule06 Jan 25 person by visibility 314 categoryराज्य
▪️मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने प्रजागर्क पदवी
कोल्हापूर : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणीला लवकरच तीर्थक्षेत्र अ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत आहे की जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले. काल नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे दुसरे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजात व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक आहेत ते काल नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले.
यावेळी जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज, मंत्री वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश अबिटकर, आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महडिक, आमदार अशोक माने, आमदार शिवाजी पाटील, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित आचार्य विशुद्ध महाराज यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ यांच्यावतीने प्रजागर्क पदवी देण्यात आली. उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर येथे येत असताना दोन हजार वर्षाचा इतिहास असणाऱ्या नांदणी मठात येता आले. या मठात एक वेगळं असं जीन शासन पाहायला मिळतं. आचार्यांचे आशीर्वाद आणि सर्व श्रोत्यांचे दर्शन लाभेल म्हणूनच या कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. आपली जैन तत्त्व ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले परंतु हे जैन विचार अजूनही त्याच प्रकारे शाश्वत टिकून आहेत. ‘ज्याच्यात शक्ती असेल तो टिकेल’ ही पश्चिमी विचारसारणी आपण न स्वीकारता आपली विचारसैली शाश्वत ठेवली. ‘जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा विचार आपला आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा असा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
संपूर्ण जीवसृष्टी वाचवण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठं काम आचार्य करतात. तपस्या करून चांगले सुविचार आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. जैन समाजातील आचार्य तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरूपात नव्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवले जातात असे ते पुढे म्हणाले.
धर्मशास्त्र कधीच राजशक्तीवर अवलंबून राहिले नाही परंतु धर्म सत्तेच्या विकासाच्या यात्रेमध्ये राजसत्ता निश्चितच प्रयत्न करेल. यासाठी येथील मठाच्या विकासासाठी आवश्यक सुविधाही देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले गेले ते अधिक बळकट करून प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. त्यामधील सुधारणांबाबत आलेले विचार समोर ठेवून भविष्यात महामंडळे अधिक मजबूत आणि गतीने काम करण्यासाठी तयार केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये निश्चितच आम्ही करू असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. नांदणी येथे 743 गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ येथे 12 वर्षांनंतर महामस्तिकाभिषेक सोहळ्याचे आयोजन 1 ते 9 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.
▪️अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू
स्थानिक आमदार यांनी शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी असल्याचा त्यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.