अरुण डोंगळे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली : प्रदेशाध्यक्ष खास. सुनील तटकरे
schedule23 Sep 25 person by visibility 276 categoryराजकीय

कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये संचालक चेअरमन म्हणून काम करत असताना अरुण डोंगळे यांनी नेहमीच शेतकरी आणि दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. दूध उत्पादकांच्या हिताच्या योजना राबवल्या सहकार समाजकारण राजकीय क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे पक्षाची ताकत कैक पटीने वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटना आणि शक्ती वाढण्यात डोंगळे यांचे संघटन कौशल्य उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुण डोंगळे यांचा योग्य सन्मान राखेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुंबई येथे गोकुळ दूध संघांचे माजी अध्यक्ष व विद्यमान जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अरुण डोंगळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात 100 हत्तींचे बळ मिळाले आहे. डोंगळे यांच्या प्रवेशाचा पक्षाला सहकाराबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.
मुंबई येथे झालेल्या अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी राधानगरी तालुक्याच्या प्रत्येक गावातून अरुण डोंगळे यांचे प्रमुख समर्थक उपस्थित होते
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे सचिव आमदार शिवाजी गर्जे, आमदार ईद्रिस नायकवाडी, आमदार संजय खोडके, आनंद परांजपे, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित होते. या प्रवेशाने राधानगरी व भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी आणखी मजबूत होण्यास बळ मिळणार आहे. यावेळी गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील, किसन चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भोगावती साखर कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिंगबर मेडसिंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे, सम्राट डोंगळे, संदीप डोंगळे, युवा शक्ति अध्यक्ष सुहास डोंगळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अरुण डोंगळे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.