स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळा
schedule16 Nov 25 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमांतर्गत शहरातील हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार घेण्यात आली.
यावेळी हॉटेल व्यावसायिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करूनच महापालिकेच्या घंटागाडी किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. एकल प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे तसेच प्लॅस्टिक बंदीबाबतचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार हॉटेल मधील कचरा उघड्यावर टाकल्यास संबंधीतांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई होऊ शकते याचीही माहिती देण्यात आली.
उपायुक्त परितोष कंकाळ व सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी हॉटेलमधील सांडपाण्याचे योग्य नियोजन करून त्यावर प्रक्रिया करणे व शक्य असल्यास त्याचा पुनर्वापर करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया झूम प्रकल्पाला भेट देऊन संपूर्ण कचरा व्यवस्थापनाची माहिती करून घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेत हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या व मतेही जाणून घेण्यात आली. तसेच चेंबर ऑफ कॉमर्स, प्लास्टिक विक्रेते व दुकानदार यांच्यासोबतही बैठक आयोजित केली असल्याची माहिती देण्यात आली. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानबाग यांनी हॉटेल धारकांना महापालिकेसोबत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच व्यावसायिकांनी आपला कचरा जास्तीत जास्त वर्गीकरण करूनच आपल्याकडे येणाऱ्या घंटागाडीकडे किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीकडे द्यावा अशी विनंती केली. शहरातील हॉटेल संघटनेचा महापालिकेच्या कचरा संकलनास 100 टक्के सहभाग राहील असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, असोसिएशनचे पदाधिकारी सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, विवेक शिंदे, योगेश सावंत, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, रोहित घोरपडे व हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.